पुण्यात खून करून लोणी काळभोर येथे मृतदेहाची विल्हेवाट, वरवंडच्या दोघांसह तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – संगमवाडी येथील एका तरुणाचा दगडाने ठेचून खुन करुन त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जाणाऱ्या तिघा जणांना लोणी काळभोर पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. हा प्रकार वाघोलीकडून थेऊरकडे जाणाऱ्या रोडवर पहाटे पावणेचार वाजता घडला. लोणी काळभोर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

अशोक संतोष आडवाणी (वय २२, रा. पिंपरी), अक्षय दिलीप पवार (वय १९, रा. वरवंड, दौंड) आणि विजय संतोष पवार (वय १९ रा. वरवंड, दौंड) अशी त्यांची नावे आहेत. तर भारत राजू बढे (वय २४, रा. कासारवाडी) असे खुन करण्यात आलेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, पोलीस नाईक संदीप सुरेश देवकर हे त्यांच्याबरोबर २ होमगार्ड यांना घेऊन थेऊर गाव येथे रात्री गस्त घालत होते. पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास त्यांना वाघोलीकडून थेऊरकडे चार जण एकाच मोटारसायकलवरुन जाताना दिसले. त्यांच्यातील एकाच्या डोक्यावर प्लास्टिक गोणी झाकली होती व अंगावर रक्ताचे डाग असल्याचे त्यांना जाणवले. त्यामुळे त्यांना शंका आल्याने त्यांनी पाठलाग करण्यास सुरुवात केली. पोलीस पाठलाग करत असल्याचे दिसल्यावर त्यांनी थेऊर फाटा येथे गोणीत झाकलेल्यास रस्त्याच्या बाजूला टाकून ते यवतच्या दिशेने पळून जाऊ लागले. देवकर यांनी होमगार्डांबरोबर त्यांचा पाठलाग करुन तिघांना पकडले.

त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी भारत बढे यांचा खुन करुन त्याच्या मृतदेहाची निर्जन जागी विल्हेवाट लावण्यासाठी ते घेऊन जात असल्याचे सांगितले. खुनाची माहिती मिळण्यापूर्वीच गस्त घालणाऱ्या पोलीस आणि होमगार्ड यांच्या दक्षतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. लोणी काळभोर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Visit – policenama.com 

You might also like