Pimpri News : टोळक्याकडून पुन्हा वाहनांची तोडफोड, तिघांना अटक

निगडी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाहनांची तोडफोडीचे सत्र सुरुच आहे. नववर्षाच्या रात्री चिंचवडमध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर निगडीमध्ये दोन आयशर टेम्पोच्या काचांची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आरोपींनी जबरदस्तीने पैसे हिसकावून घेत वाहनांची तोडफोड केली. ही घटना शनिवारी (दि.2) रात्री दहाच्या सुमारास निगडी येथील अंकुश चौकात घडली.

मुश्ताक मजीद शेख (वय-32 रा. पांढारकर चाळ, दळवीनगर, आकुर्डी), इम्तीयाज मुस्ताक शेख (वय-25 रा. फातीमा मस्जिद जवळ, ओटास्किम, निगडी), साहील इंद्रीस शेख (वय-17 रा. श्रमीक हौ. सोसायटी, एकता चौक, रुपीनगर तळवडे) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रियाज कासिम हालयाळ (वय-28 रा. निगडी) आणि नफिज सलीम शेख (वय-36 रा. निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रियाज हालयाळ हे अंकुश चौकामध्ये चिकन मालाचे पैसे घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी इम्तीयाज शेख याने त्यांच्यावर कोयता उगारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करत धमकी दिली. तर आरोपी साहील शेख याने फिर्यादी यांचा शर्ट फाडून खिशातील रोख 6 हजार 430 रपुये आणि 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरुन नेला. तसेच त्या ठिकाणी उभ्या असलेल्या आयशर टेम्पोची (एमएच 14 डीएम 7906) काच लोखंडी रॉड व कोत्याने फोडून परिसरात दहशत पसरवली.

आरोपींनी फिर्यादी नफिज शेख यांनी अंकुश चौकात उभा केलेला त्यांचा आयशर टेम्पोच्या (एमएच 43 ई 7438) दरवाजाच्या काचा फोडून गाडीत ठेवलेली 3 हजार रुपयाची रोकड जबरदस्तीने घेतली. फिर्यादी हे त्यांना जाब विचारण्यासाठी जात असताना आरोपींनी लोखंडी रॉड आणि कोयता दाखवून त्यांना धमकावले. तसेच त्यांना शिवीगाळ करत परिसरात दहशत पसरवली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बांबळे करीत आहेत.