बुलढाणा : विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिघांना अटक

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन – हुंड्यासाठी पती आणि सासू-सासऱ्यांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (दि. 26) रात्री काटेल येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी मृत महिलेचा पती, सासू व पोलिस कर्मचारी असलेल्या सासऱ्याला तामगाव पोलिसांनी अटक केली आहे.

प्रियंका शत्रुघ्न डामरे (वय 26) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी शत्रूघ्न डामरे, सासरे वामन हरी डामरे व सासूला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काटेल (ता.संग्रामपूर) येथील प्रियंका शत्रुघ्न डामरे हिच्याकडे माहेराहून 1 लाख रूपये हुंडा आणण्यासाठी तिचा पती शत्रूघ्न, सासू व सासरे वामन हरी डामरे या तिघांनी प्रियंकाचा शारीरिक, मानसिक छळ केल्याचा आरोप प्रियंकाच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान बुधवारी (दि. 27) तीनही आरोपींना संग्रामपूर न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सुनेच्या हुंडाबळी प्रकरणात पोलिस कर्मचाऱ्याला अटक झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तामगावचे पोलिस निरीक्षक भूषण गावंडे, उपनिरिक्षक श्रीकांत विखे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.