Pune : युवासेनेच्या पदाधिकार्‍याच्या हत्येप्रकरणी तरूणीसह तिघांना अटक, जाणून घ्या खूनाचं कारण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात राजकीय वादातून शिवसेना पक्षाच्या युवासेनेचे पदाधिकारी व दिवंगत माजी नगरसेवकाचे सुपुत्र दीपक विजय मारटकर (वय ३२) यांचा बुधवार मध्यरात्री बुधवार पेठेतील विजयानंद चित्रपटगृह परिसरात तीक्ष्ण हत्याराने वारकरून खून करण्यात आला आहे.

यामुळे मध्यवस्तीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी काही वेळातच यातील मुख्य सूत्रधार असणाऱ्या एका तरुणीसह तिघांना अटक केली आहे. तर इतरांचा शोध घेतला जात आहे. अश्विनी कांबळे, महेंद्र सराफ आणि निरंजन मकाळे यांना अटक केली आहे. तर, सनी कोलते, संदीप कोलते, रोहित कांबळे, राहुल रागीर व इतर दोघांवर फरासखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मारटकर यांचे मेहुणे राहुल भगवान आलमखाने (वय ४३,रा. गवळी आळी, विजयानंद चित्रपटगृहाजवळ, बुधवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

महापालिका निवडणुकीत विजय मारटकर यांनी बुधवार पेठ भागातून शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. त्यावेळी अश्विनी कांबळे हिने सुद्धा बहुजन समाज पार्टीकडून या भागातून निवडणुक लढविली होती. त्यावेळी कांबळे व मारटकर यांच्यात वाद झाला होता. दरम्यान, आरोपी महेंद्र सराफ याच्या बरोबर मारटकर यांचा वाद झाला होता. तर काही महिन्यांपूर्वी दीपक मारटकर यांना आरोपींनी धमकावले होते. चार दिवसांपूर्वी दीपक यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात या प्रकाराची माहिती दिली होती. गुरूवारी (१ ऑक्टोबर) मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास मारटकर जेवण करून गवळी आळी परिसरात थांबले होते. त्यावेळी दबा धरून बसलेले हल्लेखोर दुचाकीवरून आले. मारटकर यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यास सुरूवात केली. तीक्ष्ण शस्त्राने ४७ वार केले. यात मारटकर गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा पहाटे मृत्यू झाला.

माहिती मिळताच पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक आयुक्त मिलींद पाटील, फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान याची माहिती वाऱ्या सारखी पसरली. त्यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हल्लेखोरांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असून पथके रवाना केली असल्याचे सांगण्यात आले.

मारटकर यांचा खूनानंतर सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते फरासखाना पोलीस ठाण्यात जमले होते. शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, अजय भोसले, प्रशांत बधे, नगरसेवक विशाल धनवडे, गजानन पंडीत, राजेंद्र शिंदे, भारतीय जनता पक्षाचे प्रमोद कोंढरे, रिपब्लीकन पक्षाचे मंदार जोशी, राष्ट्रवादीचे अजय दराडे, गणेश नलावडे, मनसेचे वसंत मोरे, रूपाली पाटील ठोंबरे, आशिष साबळे आदींनी पोलीस उपायुक्त गोरे यांची भेट घेतली. हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.