तीन वेळा बीपी तपासल्यानंतरच होते अचूक निदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तीन वेळा बीपी तपासले तर रक्तदाबाचं योग्य निदान होते, असे पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या संशोधकांनी अभ्यासाअंती स्पष्ट केले आहे. या संबंधीचे संशोधन जर्नल ऑफ ह्युमन हायपरटेन्शन यात छापण्यात आले आहे.

अनेकदा डॉक्टर एकदाच रक्तदाब तपासतात. अचूक रक्तदाबाचं निदान करण्यासाठी एकदा नाही, तर तीन वेळा रक्तदाब तपासला पाहिजे. तरच, योग्य निदान होऊ शकते. चूकीच्या पद्धतीने बीपी तपासला गेल्यास रुग्णांना गरज नसताना औषधे घ्यावी लागतात. त्यामुळे तीन वेळा बीपी तपासाल्यास औषधांचे शरीरावर होणारे परिणाम टाळता येतील, असा दावा संशोधकांनी केला आहे. एकदाच रक्तदाब तपासून अनेक डॉक्टर हायपरटेन्शन किंवा उच्च-रक्तदाबावर औषध सुरू करतात. एकदाच बीपी तपासल्याने ६३ टक्के लोकांमध्ये उच्च-रक्तदाब आढळून आलापण दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा केल्यानंतर रक्तदाब कमी झाल्याचे आढळले.

तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनात ६३ टक्के लोकांना एकदाच रक्तदाब तपासल्यानंतर उच्च-रक्तदाब असल्याचे आढळले. युवा वर्गात केलेल्या अभ्यासात हा आकडा १६.५ टक्के होता. तर, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा रक्तदाब तपासल्यानंतर ही संख्या १० टक्क्यांवर आली. मोठ्या संख्येने लोकांना रक्तदाब असल्याचे निदर्शनास आले. रक्तदाब हा परिस्थिती, टेन्शन, तापमान मानसिक अवस्था अशा आणि इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. त्यामुळे डॉक्टरांनी एकदा रक्तदाब तपासण्याऐवजी तीन वेळा रक्तदाब तपासावा.