बीडमध्ये नदीत बुडाल्याने 3 चिमुरड्यांचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कपडे धुण्यासाठी बहिणीसोबत गेलेल्या एकाच घरातील तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना परळी तालुक्यातील शिवारात घडली. या घटनेनं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परळी तालुक्यातील दाऊतपूर औष्णिक विद्युत केंद्राजवळ खदानीत ही घटना घडली.

आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास कपडे धुण्यासाठी याच परिसरात दगडफोड करणार्‍या मजूर कुटुंबातील 15 वर्षीय मुलगी खदानीमध्ये गेली होती. यावेळी तिच्यासोबत लहान बहीण व भाऊही होता. बराच वेळ मुले परत न आल्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी खदानीमध्ये जाऊन पाहिले असता तिघे जण पाण्यात बुडाल्याचे आढळून आले.

कुटुंबातील सदस्यांनी तिन्ही लेकरांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. मुले पाण्यात बुडून मृत्यू पावल्याने परिसरात कुटुंबीयांनी एक आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास करत आहे.