धुळे : शेळ्यांना चारा आणण्यासाठी गेलेले भावंडं घरी परतलेच नाहीत, तिघांचा बुडून मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – चिमठावळ (ता. शिंदखेडा) येथील तीघे भावंडं विहिरीत बुडून मयत झाल्याची घटना काल (दि. 23) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. तिघांपैकी दोन सख्खे भाऊ व एक चुलत भाऊ होता. दीपक लीलीधर पाटील (वय,11), गौरव लीलीधर पाटील (वय,10) दीपक ज्ञानेश्वर पाटील (वय, 14) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

रविवारी दुपारी हे तिघे भावंडं शेळ्यांना चारा आणण्यासाठी शेतात गेले होते. खुप वेळ झाला तरिही ते घरी परतले नाहीत. त्यानंतर घरच्यांनी आणि गावकऱ्यांनी शिवारात त्यांची शोधाशोध केली. त्यावेळी एकाने त्यांना विहिरीकडे जाताना पाहिले असल्याचे सांगितले. विहिरीजवळ जावून पाहिले असता विहिरीत काहीही दिसले नाही. काही जणांनी विहिरीत उडी मारून तळाशी जावून पाहिेले असता तिघांचेही मृतदेह आढळून आले. त्यानंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढून सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

तिघेही पाणी पिण्यासाठी विहिरीवर गेले असावेत, एक जण पाय घसरून विहिरीत पडला असता त्याला वाचवण्यासाठी दोघांनी विहिरीत उडी मारली असावी यातच तिंघाचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.