Wakad News : घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक, 7 लाखांचा ऐवज जप्त

वाकड/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांसह तीन जणांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सात गुन्हे उघडकीस आले असून 7 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

प्रकाश उर्फ नानाभाऊ शंकर लंके (वय-44 रा. विश्रांतवाडी, पुणे), समीर उर्फ सलीम महेबूब पैलवान शेख (वय-39 रा. मारुंजीरोड, हिंजवडी), ओंकार विभिषण काळे (वय-18 रा. धानोरी रोड, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुरुवारी (दि.14) झालेल्या घरफोडी गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत असताना आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून सहा गुन्हे केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यातील 118 ग्रॅम सोन्याचे दागिने, 20 हजार रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, चोरीच्या पैशातून घेतलेली नवी जावा दुचाकी, लॅपटॉप, स्मार्ट वॉच, घरगुती साहित्य असा एकूण 6 लाख 87 हजार 650 रुपयांचा ऐवज जप्त केला.

आरोपी प्रकाश लंके याच्यावर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात 16, खडकी 4, लोणीकंद आणि विमानतळ पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण 22 गुन्हे आहेत. तर समीर शेख याच्यावर लोणावळ्यात दोन तर लोहमार्ग पोलीस ठाण्यात एक असे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. आरोपी प्रकाश लंके हा माईनॉरिटीज सुरक्षा महासंघ-नॅशनल पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष असल्याचे सांगत असून त्याच्याकडे ओळपत्र देखील आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.