दुर्दैवी ! उमरगा येथे खड्डयात साचलेल्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू

उमरगा : पोलीसनामा ऑनलाइन – तालुक्यातील कोळसूर कल्याणीच्या दयानंदनगर तांड्याच्या शिवारात फिरत गेलेल्या तीन मुलांचा रस्त्याच्या कडेला रस्त्याच्या कामासाठी मुरुम काढलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गुरुवारी (ता. ३०) ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कोळसूरच्या दयानंदनगर तांड्यातील तीन मुले रस्त्याने फिरत होती. त्यात प्रतीक्षा पवार (वय१२), ओंकार राजूदास पवार (वय १२), अंजली संतोष राठोड (वय१३) हे शिवारातील रस्त्याच्या कडेला राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मुरूम काढण्यासाठी खडलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडली. त्यामध्ये तिघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना समजताच ग्रामस्थ व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, बिट अंमलदार वाल्मिक कोळी यांच्यासोबत पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

स्थानिक व पोलिसांनी तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. तेव्हा नातेवाईकांचा आक्रोश सुरु झाला, ग्रामस्थांचे डोळे पाणावले. तीनही मुलांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आले. याप्रकरणी संतोष राठोड यांच्यामार्फत पोलिसांत तक्रार देण्याचे काम सुरु असून, रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. यापूर्वीच ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गासाठी मुरुमाचे उत्थखनन करताना धोका निर्माण होईल या कारणावरून विरोध दर्शवला होता. पण त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले होते.