विठ्ठल मंदिरात तिरंगा फुलांची आरास

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – हिंदू सणाप्रमाणे राष्ट्रीय सण प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने शनिवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तिरंगा फुलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. यासाठी विविध प्रकारच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. यंदा प्रथमच प्रजासत्ताक दिनी अशी सजावट करण्यात आली आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने प्रत्येक हिंदू सणाला विविध फुलांची आरास करून मंदिराची सजावट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळेच प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण आहे. याचे औचित्य साधून २५ जानेवारी रोजी रात्रभर आरास करण्याचे काम पुणे येथील भारत भुजबळ यांच्यासह २० कारागीरांनी केले. यामध्ये झेंडुची फुले, तुळस, अष्टर यासह अन्य फुलांचा वापर केला आहे. यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात विविध फुलांचा सुगंध दरवळ होता. शनिवारी प्रजासत्ताक दिन आणि रविवार असे दोन सलग सुटी आल्याने आजपासून मंदिरात भाविकांची गर्दी झाल्याचे दिसून येते.