दुर्दैवी ! हिंजवडीत विजेचा शॉक बसून तिघांचा मृत्यू, एक जखमी

पुणे (हिंजवडी) : पोलीसनामा ऑनलाइन – एमआयडीसी हद्दीतील रस्त्यावर विजेचे दिवे लावत असताना तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आयटी पार्कमधील फेज -३ मध्ये घडली. ही घटना आज (सोमवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. सागर आयप्पा माशाळकर (वय 20), सागर कूपु पारंडेकर (वय 19) राजू कुपु पारंडेकर (वय 35) तिघेही, रा. बिजलीनगर, चिंचवड) अशी मृतांची नावे आहेत. तर अन्य एक जण गंभीर जखमी आहे. ही घटना भोईर वाडीतील जय गणेश कॉलनीच्या स्मशानभूमीजवळून जाणाऱ्या रस्त्यावर घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिघे रस्त्यावर नव्याने लावलेल्या पथदिव्यावर दिवे बसविण्याचे काम करत होते. रोलर शिडी ढकलत असताना वर वीज प्रवाह सुरू असलेल्या विद्युत तारा त्यांच्या लक्षात आल्या नाहीत त्यामुळे लोखंडी शिडीचा स्पर्श तारांना झाल्याने शिडीत वीजपुरवठा उतरल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. हे तिघेही खाजगी कंत्राटदाराची माणसे होती. असे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड यांनी सांगितले आहे.

अपघाताची माहिती मिळताच हिंजवडीचे पोलिस निरीक्षक अजय जोगदंड, पोलिस उप-निरीक्षक कविता रुपनर, पोलीस हवालदार दीपक परकाळे, शंकर उतेकर, विनोद मोहिते यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून जखमीला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पाठवले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत वीज पुरवठा खंडित करून चिटकेलेले मृतदेह बाजूला केले. दोषीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/