क्रिकेट खेळणाऱ्या तिघांचा वीज पडून मृत्यू, दोन गायींचाही मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना वरुणराजाच्या कृपेमुळे दिलासा मिळाला आहे. राज्यातील मुंबई-ठाणे, धुळे, सातारा, पुणे, नाशिक इत्यादी भागात आज सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी बरसल्या आहेत. नाशिकमध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मैदानात क्रिकेट खेळताना या मुलांवर काळाने घाला घातला. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील ही घटना आहे. तर दोन गायींचाही वीज पडून मृत्यू झाला.

नाशिकच्या अनेक भागात आज सायंकाळी वादळी वारी आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान, दिंडोरी येथे सुट्टी असल्याने काही मुले लिंबाच्या झाडाजवळ क्रिकेट खेळत होते. याच दरम्यान जोरदार वादळी- वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आणि अचानक झाडावर वीज कोसळली. त्यावेळी झाडाच्या आडोशाला उभ्या असलेल्या तिघांचा यामध्ये मृत्यू झाला. अनिल गवे, सागर गवे, रोहीत गायकवाड असे मृत तरुणाची नावे आहेत.

तर दिंडोरी तालुक्यातील शिवणई गावात आणि येवला तालुक्यातील देवठाण गावात वीज पडून दोन गायींचा मृत्यू झाला आहे. अचानक आलेल्या पावसाने कांदा, गहू, द्राक्ष या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.