पुणे : रिक्षा व टेम्पोच्या धडकेत तिघांचा मृत्यू, मृतांमध्ये तरुणीसह आजी – नातवाचा समावेश

पुणे/मंचर : पोलीसनामा ऑनलाइन – विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या पिकअप टेम्पोची धडक सहा आसनी रिक्षाला बसून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (गुरुवार) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास मंचर ते रांजणी रस्त्यावर थोरांदळे येथे झाला. अपघातात एका तरुणीसह आजी व नातवाचा समावेश आहे.

प्रतीक्षा यशवंत जाधव (वय-19 रा. जाधववाडी, ता. आंबेगाव), आर्यन रमेश घायतडके (वय-5) व त्याची आजी अनिता बबन कदम (वय-70 दोघे रा. थोरांदळे, ता. आंबेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रतिक्षा नथू वाघ (वय-19) व रिक्षा चालक प्रसाद बबन सुतार (वय-33 रा. रांजणी) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सहा आसनी रिक्षा मंचरहून रांजणीकडे जात होते. थोरांदळे येथे विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव वेगातील पिकअप टेम्पोची धडक रिक्षाला बसली. अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला. अपघातातील जखमींना मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी दाखल करण्यापूर्वीच तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर पिकअप चालक वाहन घटनास्थळी सोडून पळून गेला आहे.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/