विचित्र अपघात ! बापलेकासह तिघांचा मृत्यू, 11 जखमी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – टायर फुटल्याने अनियंत्रित झालेल्या टेम्पोच्या धडकेने झालेल्या दुर्दैवी अपघातात बापलेकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून अकरा जण जखमी झाले. सोमवारी पहाटे नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव शिवारात हा भयानक अपघात झाला.

आळंदीला नातलगाच्या दशक्रिया विधीसाठी नगर शहरातील बिमन व दोमल हे कुटुंबीय ट्रॅव्हलर गाडीने गेले होते. दशक्रिया विधी आटोपून तिकडून माघारी परतीच्या प्रवासात असताना जातेगाव घाटात समोरून येणाऱ्या वेगातील टेम्पोचा टायर फुटला. अनियंत्रित झालेला हा ट्रक भरधाव वेगात असल्याने दुभाजक ओलांडून मिनीबसवर (ट्रॅव्हलर) जोराने धडकला. या धडकेत बसमधील लक्ष्मी दोमल यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच विश्वनाथ बिमन हेदेखील जागीच ठार झाले, तर त्यांचा मुलगा ओंकार बिमनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत 11 प्रवासी जखमी झाले असून सर्व जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

या अपघातातील जखमींमध्ये किसन बलराज बिमन (रा. पाइपलाइन रोड, सावेडी), सुषमा वसंत ऐनगंदूल (रा. श्रमिकनगर, सावेडी), उज्ज्वला शंकर बिमन (शिवाजीनगर, कल्याण रोड), सौंदर्या शंकर बिमन (वय १०), रामचंद्र बलराज बिमन (रा. सर्जेपुरा), वज्राबाई दत्तात्रय बिमन (शिवाजीनगर, नेप्ती नाका), शंकर दत्तात्रय बिमन (कल्याण रोड) यांचा समावेश आहे. तर लक्ष्मी वसंत दोमल (वय ६५, रा. सातभाई गल्ली, तोफखाना), विश्वनाथ बाळराम बिमन (वय ५०), ओंकार विश्वनाथ बिमन (वय १०, दोघेही रा. लोणार गल्ली, नगर) यांचा यात मृत्यू झाला.

सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सदर अपघात घडला. अपघातानंतर सुपा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनेचा पंचनामा केला. या अपघातप्रकरणी टेम्पोचालकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सुपे पोलिसांनी दिली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.