दुर्देवी ! सिलिंडरच्या स्फोटानं 3 वर्षाच्या बालकासह आई-वडिलांचा मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन : नाशिक रोड परिसरातील एकलहरा रोडवर असलेल्या संभाजीनगरातील भोर मळा येथील एका कुटुंबात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन 3 वर्षांच्या चिमुरड्यासह आई-वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या स्फोटामुळे कुटुंबातील सर्वच गंभीररित्या आगीने होरपळले असून ३ वर्षाचा अथर्व आणि आई नम्रता कांबळे (वय-४०) यांचा रुग्णालयात उपचार करतानाच मृत्यू झाला. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. या आगीत कुटुंबप्रमुख नरसिंग कांबळे (वय-४४) हे देखील आगीने होरपळले असून उपचारादरम्यान त्यांचाही काल, मंगळवारी रुगणालयातच मृत्यू झाला. यामुळे आजूबाजूच्या परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक रोड परिसरातील एकलहरा रोडवरील रेल्वे ट्रॅक्शनसमोर असलेल्या संभाजीनगरातील भोर मळा येथे नरसिंग कांबळे हे पत्नी, तीन मुलांसह वास्तव्य करत होते. नरसिंग कांबळे यांच्या पत्नी नम्रता ह्या नेहमीप्रमाणे सकाळी स्वयंपाकगृहात गेल्या आणि गॅस पेटवला पण अचानक भपका उडाला आणि संपूर्ण कुटुंबासह आजूबाजूचा परिसर हादरला. गॅसच्या गळतीमुळे हि दुर्दैवी घटना घडल्याचे समजते.

या घटनेत गॅसच्या स्फोटाने नरसिंग कांबळे यांचे संपूर्ण कुटुंब होरपळले असून शहरात शोककळा पसरली आहे. कुटुंबातील सगळ्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता अथर्व या ३ वर्षाच्या चिमुरड्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. अथर्व याचा अंत्यसंस्कार होत नाही तेवढ्यातच आई नम्रता कांबळे यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यापाठोपाठ दुसऱ्या दिवशी मंगळवारी कुटुंबप्रमुख नरसिंग कांबळे यांचीही प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आता मुलगा निखिल नरसिंग कांबळे आणि नेहा नरसिंग कांबळे असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संपूर्ण नातलग आणि परिसरातील सर्व ठिकाणी शोककाळेचे वातावरण पसरलेले आहे.

Visit :  Policenama.com