Satara News: भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, तिघे मृत कराड तालुक्यातील

भुईंज : पोलीसनामा ऑनलाइन – महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून येणार्‍या झायलो गाडीने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघेजण जागीच ठार झाले. तर एकजण जखमी झाला आहे. महामार्गावर सुरूर उड्डाण पुलावर शुक्रवारी (दि. 26) रात्री ही दुर्घटना घडली. तिघे मृत कराड तालुक्यातील असून मसूर व कराड शहरावर शोककळा पसरली आहे.

केदार दत्तात्रय वेल्हाळ (वय 25), अजय रवींद्र सुतार (27, दोघे रा. मसूर), सुजित रामचंद्र आवटे (42, रा. रुक्मिणीनगर कराड) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. अशोक शिवाजी कांबळे (26, रा. वाघेरी) असे जखमी युवकाचे नाव असून त्याच्यावर सातार्‍यात उपचार सुरू आहेत.

भुईंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झायलो गाडीतून कराडचे चौघेजण आपल्या गावी निघाले होते. त्यावेळी महामार्गावर सुरुर उड्डाण पुलावर टायर फुटल्याने उभा असलेल्या ट्रकला झायलो गाडीने जबर धडक दिली. या अपघातात गाडीतील चौघेही जखमी झाले. त्यांना तातडीने साता-यातील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे, पीएसआय रत्नदीप भांडारे, हवालदार विजय अवघडे, हवालदार सचिन नलवडे वाघ आदीनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला.