बीड : कांदा घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात, 3 शेतकऱ्यांचा मृत्यू

नेकनूर/बीड : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर मार्केटमध्ये विक्रीसाठी कांदा घेऊन जाणाऱ्या टेम्पोचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात बीड जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाली. हा अपघात बुधवारी (दि.16) पहाटे दोनच्या सुमारास तुळजापूरच्या घाटात झाला. टेम्पोचा (एमएच 16 एई 7704) टायर फुटल्याने टेम्पो दुभाजकावर जाऊन जोरात धडकला.

अपघातांमध्ये टेम्पो चालक शेख सज्जाद सकलेन (वय-40 रा. नेकनूर), देवराव तुळशीराम शिंदे (वय-55 रा. गवळवाडी, नेकनूर), मोहन भागवत मुंडे (वय-45 रा. निवडूंगवाडी) या तिघांचा मृत्यू झाला. तर भागवत शिवाजी मुंडे (वय-40 रा. निवडूंगवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेने नेकनूरसह निवडूंगवाडीवर शोककळा पसरली आहे. नेकनूरपासून काही अंतरावर असलेल्या निवडूंगवाडी आणि नेकनूर येथील गवळवाडी येथील हे शेतकरी आपला कांदा एकत्रित करुन सोलापूर मार्केटमध्ये विक्री करण्यासाठी जात होते.

अपघातात जखमी झालेल्या भागवत मुंडे यांच्यावर उस्मानाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती नेकनूर आणि निवडूंगवाडी येथील नागरिकांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेनंतर नेकनूर, निवडूंगवाडी, गवळवाडी गावातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. मृत चालक नेकनूर येथील असून ते आपल्या मनमिळावू स्वभाने सर्वत्र परिचित होते.