‘एटीएम’ची दीड कोटी रक्कम लंपास, तिघांवर गुन्हा

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – बॅकांकडून एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी घेतलेले १ कोटी ४१ लाख रुपये लंपास केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद अंकुश शिंदे (४१, रा. विसावा पार्क, सातारा, मूळ रा. अंगापूर-वंदन), विक्रम जयसिंग शिंदे (३५, रा. अंगापूर-वंदन), वैभव लक्ष्मण वाघमळे (३४, रा. कण्हेर, ता. सातारा) अशी या आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे एवढा मोठा प्रकार उघडकीस आल्यानंतर कंपनीने ताबडतोब गुन्हा दाखल न करता प्रमोद शिंदे या कर्मचाऱ्याकडून परस्पर पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला. शिंदे याने २९ लाख ६० हजार रुपये कंपनीस परत केले. उर्वरित १ कोटी ११ लाख ४० हजार देण्यास तो टाळाटाळ करु लागल्यानंतर कंपनीने गुन्हा दाखल केला.

कोल्हापूर येथील सिक्युरिट्रन्स कंपनीकडे सातारा जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ॲक्सिस बँक, युनियन बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम मशीनमध्ये रोकड भरण्याचे काम आहे. या कामासाठी कंपनीने प्रमोद शिंदे याची नियुक्ती इन्चार्ज म्हणून केली होती. त्याच्यासोबत विक्रम शिंदे, वैभव वाघमळे, एक चालक व एक बंदुकधारी यांची नेमणूक कंपनीने केली होती. कामासाठी कंपनीने दिलेल्या अधिकार पत्रानुसार प्रमोद शिंदे हा विविध बँकांकडून एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी रोकड घेत असे. या रक्कमेचा भरणा एटीएम मशीनमध्ये केल्यानंतर त्याबाबतचा अहवाल तो कंपनीला देत असे.

धक्कादायक… पुण्यात विनयभंग करणाऱ्यास प्रतिकार केल्याने महिलेवर चाकू हल्ला

१३ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रमोद शिंदे, वैभव वाघमळेंनी भुईंज येथील विरंगुळा हॉटेलच्या एसबीआय एटीएम सेंटरमधून परस्पर ८ लाखांची रोकड काढून घेतली. ही बाब बँकेच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याची माहिती कंपनीस दिली. या प्रकाराचा संशय आल्याने कंपनीने चौकशी करण्यासाठी दोन जणांची नियुक्ती केली. त्यांनी तपास करुन कंपनीस अहवाल दिला. या अहवालात दि. ७ फेब्रुवारी २०१८ स्टेट बँकेकडून घेतलेल्या ७८ लाखांपैकी ४३ लाख, बँक ऑफ महाराष्ट्रकडून घेतलेले ३२ लाख तसेच ॲक्सीस बँकेतून घेतलेले ६६ लाख रुपये लांबवल्याचे म्हटले होते. प्रमोद शिंदे व इतरांनी १ कोटी ४१ लाख लांबविल्याचे लक्षात आल्यानंतर कंपनीने त्यांना कामावरुन कमी करत ती रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरु केली. या काळात प्रमोद शिंदे याने २९ लाख ६० हजार रुपये कंपनीस परत केले. उर्वरित १ कोटी ११ लाख ४० हजार देण्यास शिंदे टाळाटाळ करु लागल्याने कंपनीने तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

जाहिरात