Kolhapur : पाण्याचा टँक स्वच्छ करताना 3 कर्मचाऱ्यांचा गुदमरुन दुर्दैवी मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा टीम – कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील टाकीची साफसफाई व पाईपलाईन ब्लॉकेज काढण्यासाठी गेलेल्या तिघांचा मिथेने वायूमुळे गुदमरुन मृत्यू झाला. ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास कारखान्याच्या मगील बाजूस पर्यावरण विभागात घडली. संदीप रमेश कांबळे (वय-38 रा. कुटवाड), राजेश यशवंत ठुमके (वय-40 रा. उदगाव), गोपाळ सिद्राम जंगम (वय-43 रा. औरवाड) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, श्री दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पाणी पाईपला गळती लागली होती. त्यामुळे ती दुरुस्त करताना त्याची स्वच्छता करण्यासाठी तीन कामगार टाकीत उतरले होते. मात्र, टाकीत गॅस तयार झाल्याने तीघांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यातून ते गुदमरल्याने तेथेच बेशुद्ध पडले. त्यांना वाचवण्यासाठी आणखी एक कर्मचारी टाकीत उतरला. तो देखील गॅसमुळे बेशुद्ध पडला. पण इतर कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने बाहेर काढले. सर्व कामगारांना कारखान्यात असलेल्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीसनंतर डॉक्टरांनी तिघांना मृत घोषीत केले. यामध्ये राजू राजपूत हा बचावला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.

शिरोळ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. दरम्यान, श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी ते म्हणाले, ही घटना दुर्दैवी आहे. मृतांच्या परिवाराच्या पाठीशी कारखाना राहील. मृतांच्या कुटुंबातील एकास नोकरी देण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले.