तिच्या धाडसाला सलाम …! केली बिबट्याची धुलाई , बिबट्या पसार

खेड : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे आणि आसपासच्या परिसरात बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. खेड तालुक्यातील रेटवडी यथील ठाकरवाडी येथे बिबट्याने तीन तास धुमाकूळ घालत एका शेळीवर हल्ला करून तिला जखमी केले. यावेळी खेड येथील पंचायत समिती सभापती सुभद्रा शिंदे यांनी प्रसंगावधान दाखवून बिबट्याचा हल्ला परतून लावला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनखात्याने या परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सुभद्रा शिंदे रात्री घराबाहेरील अंगणात झोपल्या होत्या. अंगणासमोरच चार शेळ्या बांधल्या होत्या. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक बिबट्याने शेळीवरती झडप घातली. शिंदे यांना आवाजामुळे जाग आली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, बिबट्या शेळीचे मानगूट पकडण्याचा प्रयत्न करीत आहे. याचवेळी सुभद्रा यांनी प्रसंगावधान राखून अंगावर पांघरण्यासाठी घेतलेले ब्लँकेट बिबट्याच्या अंगावर टाकले. ब्लँकेटने बिबट्याला मारण्यास सुरुवात केली. दरम्यान, बिबट्याचा एक पाय ब्लँकेटमध्ये अडकला आणि बिबट्याने धूम ठोकली. त्यानंतर पुन्हा अर्ध्या तासाने बिबट्या ठाकरवाडी येथील रस्त्यामधेच ठाण मांडून बसला. शिंदे यांनी जवळपासच्या ग्रामस्थांना बोलविले. मात्र, बिबट्या जागेवरुन हलण्यास तयार नव्हता.

सुमारे तीन तास हा बिबट्या या परिसरात फिरत होता त्यामुळे ग्रामस्थानी संपूर्ण रात्र जागून काढली. बिबट्याच्या दहशतीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याठिकाणी वनविभागाकडून पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.