पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बारामती तालुक्यातील काटेवाडी परिसरात सलग तिसर्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला रविवारी पहाटे यश आले. विशेष म्हणजे गेल्या ६ महिन्यात एकाच शेतकर्याच्या शेताच्या आजू बाजूला लावलेल्या पिंजर्यात हे तिन्ही बिबटे अडकले आहेत.
पिंजर्यात सापडलेला बिबट्या ही मादी आहे. यापूर्वी नर आणि मादी बिबटे वन विभागाने पकडले होते. हे बिबटे माळरानावरील हरणांच्या शिकारी करीत होते. त्यांनी जनावरांवरही हल्ले करणे सुरु केल्याने या परिसरातील शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.
बिबट्यांनी शेळी, मेंढी, गायी आणि कुत्र्यांवर हल्ला करुन त्यांचा फडशा पाडल्यामुळे शेतकर्यांनी डिसेंबर २०१९ मध्ये बिबटे लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार संतोष जाधव यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता. त्यात डिसेंबरमध्ये एक बिबट्या कैद झाला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात याच ठिकाणापासून काही अंतरावर दुसर्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले होते.
दोन बिबटे पकडल्यानंतर या भागातील बिबट्यांचा वावर कमी होताना दिसत नव्हता. तसेच प्राण्यांवर हल्ले होतच होते. त्यामुळे वन विभागाने पुन्हा याच भागात पिंजरा लावला होता. त्यात रविवारी पहाटे एक बिबटा सापडला. या बिबट्याला बारामतीतील एमआयडीसीमधील कार्यालयात हलविण्यात आले आहे.
या भागात नेमके किती बिबटे आहेत, याची पाहणी करण्याची मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे.