सत्संगसाठी आलेले तीन अल्पवयीन मुले बेपत्ता

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – हनुमंत चिकणे – सत्संग करिता आलेली तीन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची घटना गुरुवारी (दि. ११) घडली आहे. ही घटना टिळेकरवाडी येथे घडली असून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मुले बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

केशव राजेंद्र पटेल (वय- १४ रा. बामखेडा, ता. शहादा, जि. नंदुरबार), शुभम बाळासाहेब बोरगे (वय- १५ रा. खेपडी, ता. सिन्नर, जि. नाशिक) आणि गोपीचंद नरेंद्रमुनी अंकुलेनकर (वय- १४ रा. तुडका, ता. तुमसर जि. भंडारा सध्या तिघेही रा. जाधववाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत. याप्रकरणी राजेंद्र दत्तात्रय खेडेकर (वय – ४१ रा. इनामदारवस्ती, कोरेगाव मूळ) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, हरिभाऊ तात्याबा कांचन, इंद्रभान सोनबा लोनकर, संजय बाजीराव भोसले, व शामराव बबनराव सावंत या चौघांनी मिळून एक महिन्याच्या महानुभव पंत सत्संगाचे आयोजन टिळेकरवाडी येथील लोनकरवस्ती येथे केले आहे. यावेळी जाधववाडी येथील श्री देवदत्त आश्रमाची सत्संगसाठी दीड हजार साधुसंत व ५१ मुले आली होती.

गुरुवारी (दि. ११) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मंडपातून सत्संगसाठी आलेली केशव पटेल, शुभम बोरगे, गोपीचंद अंकूळनेरकर ही तीन मुले कोणाला काहीही न सांगता कोठेतरी निघून गेली. ती परत आलीच नाहीत. नातेवाईक, पाहुणे, मित्र यांच्याकडे चौकशी केली असता, आढळून आले नाहीत. अज्ञात व्यक्तीने अमिष दाखवून अपहरण केल्याच्या संशयावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केशव पटेल याची उंची ४ फूट २ इंच, अंगाने सडपातळ, अंगात फूल भायाचा शर्ट व राखाडी पँट घातली आहे. शुभम बोरगे याची उंची ४ फूट ३ इंच, अंगाने सडपातळ, फूल भायाचा शर्ट व निळ्या रंगाची पँट घातली आहे. गोपीचंद अंकुलेनकर उंची ४ फूट १ इंच, फुट अंगाने सडपातळ, फूल भायाचा पांढरा शर्ट व फिक्कट निळसर रंगाची पँट घातलेली आहे. या वर्णनाची मुले आढळून आल्यास लोणी काळभोर पोलिसांशी (०२० – २६९१३२६०) संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.