Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’चे आणखी 3 नवे रूग्ण आढळले, एकुण संख्या 24

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात मागील दोन दिवसांत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे पुणेकरांसाठी ही दिलासादेणारी बाब होती. असे असतानाच आज (शनिवारी) पुन्हा तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 24 वर पोहचली आहे. नव्याने सापडलेले हे रुग्ण कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले होते. पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांनी ही माहिती दिली आहे.

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज पुण्यात 3 नवे रुग्ण आढळून आल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 170 वर पोहचली आहे. यापूर्वी मुंबई आणि नागपूरमध्ये 8 नवे रुग्ण आढळून आल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 167 वर पोहचली होती. शुक्रवारी दिवसभरात 17 नवीन रुग्ण आढळले होते. सांगलीत नवे 12 रुग्ण तर नागपूरमध्ये 5 रुग्ण आढळले होते. नवी मुंबईत दीड वर्षाच्या बाळाला देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

दरम्यान देशभरात कोरोनाचा धोका वाढत असून आतापर्यंत 834 जणांना कोरोना झाल्याचे समोर आलं आहे. देशात आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात 75 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 67 रुग्ण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. मागील दोन महिन्यात परदेशातून आलेल्या प्रवाशांची देखरेख करण्याची गरज असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मागील दोन महिन्यात तब्बल 15 लाख प्रवासी परदेशातून भारतात आले आहेत