Coronavirus : पुण्यात ‘कहर’ ! ‘कोरोना’चे 24 तासात 8 बळी तर 25 नवे रूग्ण, आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं पुणे शहरात अक्षरशः धुमाकूळ घातला असून गेल्या 24 तासात कोरोनामुळं शहरात एकुण 8 जणांचा मृत्यू झाल्याचं एनएनआय या वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे. दरम्यान शहरात आज नव्याने तब्बल 25 कोरोनाबाधित आढळले असून शहरातील एकुण रूग्णांची संख्या 154 वर जाऊन पोहचली असल्याचं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवरून सांगितलं आहे. दरम्यान, पुण्यात कोरोना व्हायरसमुळं मृत्यू होणार्‍यांची संख्या आता 16 वर जाऊन पोहचली आहे.


आज (बुधवार) ससून रूग्णालयात 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर नायडू हॉस्पीटलमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. इतर दोघांचे मृत्यू वेगवेगळया खासगी रूग्णालयात झाले आहेत. गेल्या 14 तासात कोरोनामुळं शहरात 8 जणांचा मृत्यू झाल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेनं सांगितलं असल्याचे सर्वत्र खळबळ उडाली आहे. नव्याने आढळणार्‍या रूग्णांची संख्या देखील 25 असल्याने शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 154 वर जाऊन पोहचली आहे. दरम्यान, शहरात कोरोनामुळं 8 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला मनपाच्या आरोग्य विभागाचे डॉ. रामचंद्र हंकारे यांनी देखील दुजोरा दिला आहे.


एकंदरीत पुण्यात कोरोनामुळं चिंतेचं वातावरण आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी केलं जात आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्, पुणे मनपाचे आयुक्त शेखर गायकवाड तसेच पुण्याचे सह पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे आणि प्रशासनातील तसेच आरोग्य विभागातील इतर सर्व वरिष्ठ अधिकारी पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजन करीत आहेत. पोलिसांनी दोनच दिवसांपुर्वी 4 पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काही परिसर सील केला असून तिथं संपुर्णपणे संचारबंदी देखील केली आहे.