Coronavirus : पुण्यात आज ‘कोरोना’मुळं 6 जणांचा बळी, मृतांची संख्या 24 वर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशात 25 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत जात असल्याचे समोर आले आहे. पुण्यात आज (गुरूवार) दिवसभरात एकुण 6 जणांचा मृत्यू झाल्याचं एएनआय वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे. आता पुण्यात कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या 24 वर जाऊन पोहचली आहे.


गुरूवारी सकाळच्या सत्रामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामधील दोघांचा ससून रूग्णालयात मृत्यू झाला होता तर तिसर्‍याचा मृत्यू खासगी रूग्णालयात झाला होता. सायंकाळी साडेसात वाजण्यापुर्वी आणखी तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या हवाल्यानं दिली आहे. त्यामुळे पुण्यातील मृत्यूची संख्या आता 24 वर जाऊन पोहचली आहे. पुणे महापालिका आणि पुणे पोलिसांकडून शहरातील काही भाग सील करण्यात आला आहे तर काही ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू ये असे आवाहन देखील करण्यात येत आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेली 5 वाजेपर्यंतची माहिती खालील प्रमाणे

1. पुणे विभागातील तब्बल 40 कोरोनाबाधित रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
2. आज पुणे विभागात तब्बल 53 नवीन रूग्णांचे निदान झाले आहे.
3. विभागातील एकूण रूग्ण संख्या आता 246 वर जाऊन पोहचली आहे.