भारतात आणखी 3 राफेल विमानं दाखल

नवी दिल्ली: पोलिसनामा ऑनलाईन – भारताने फ्रान्सकडून एकूण ३६ अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानं विकत घेतली आहेत. यांपैकी आत्तापर्यंत भारतात दोन बॅच दाखल झाल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी राफेलची तिसरी बॅच भारतात दाखल झाली. नॉनस्टॉप ७००० किमीचं अंतर या विमानांनी पार केलं. दरम्यान, हवेतचं या इंधन भरण्याची कमालही या विमानांनी केली. भारतीय हवाई दलानं ही माहिती दिली. राफेलच्या तीन बॅच भारतात आल्या असून त्यामध्ये एकूण ९ विमानं आहेत. फ्रान्सच्या इस्ट्रेस एअर बेसवरुन निघालेली ही तीन विमानांची बॅच भारतातील एअर बेसवर दाखल झाली. या विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी युएई एअर फोर्सने पाठवलेल्या इंधन टँकरसाठी भारताने ट्विटद्वारे आभार मानले.

फ्रान्सकडून भारतात तीन बॅचमध्ये एकूण ९ विमानं दाखल झाली आहेत. पाच विमानांची पहिली बॅच भारतात २८ जुलै रोजी दाखल झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये विमानांची दुसरी बॅच भारतात दाखल झाली होती.येत्या मार्चमध्ये तीन आणखी राफेल विमानं भारतात दाखल होणार आहेत. त्यानंतर एप्रिल महिन्यांत आणखी सात विमानं येतील.

प्रजासत्ताक दिनी राफेलनं केलं शक्तीप्रदर्शन
अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांनी पहिल्यांदा यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर आकाशात आपलं शक्तीप्रदर्शन केलं. अनेक कसरती करत या विमानांनी आपल्या ताकदीचे प्रदर्शन घडवले.