नक्षली-सुरक्षा दल चकमकीत ३ नक्षलवाद्यांचा खात्मा

गुमला (झारखंड ) : वृत्तसंस्था – झारखंडमध्ये सुरक्षा जवान आणि नक्षलवादी यांच्यात आज पहाटे जोरदार चकमक झाली. त्यात ३ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आहे. या परिसरात आणखीही काही नक्षलवादी लपले असण्याची शक्यता असल्याने सुरक्षा दलाकडून शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. झारखंडमध्ये १८ जिल्हे नक्षलग्रस्त असून त्यातील १३ जिल्हे अतिसंवेदनशील आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील गुमला येथे पहाटे सुरक्षा जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली. त्यात तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. त्यांच्याकडून २ एके ४७ रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत. गुमलामधील कामडारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही नक्षलवादी लपले असून ते मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत अशी खबर सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांविरोधात शोधमोहीम सुरु केली होती. सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरत नक्षलवाद्यांना शरण येण्यास सांगितले. मात्र, या आवाहनाला न जुमानता नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलाच्या जवानांही गोळीबार केला. या चकमकीत तीन नक्षलवादी मारले गेले.

गेल्या महिन्यात नक्षलग्रस्त सिंहभूम जिल्ह्यात सुरक्षा दलाने चकमकीत ५ नक्षलवाद्यांना ठार केले होते. तेव्हाही घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र साठा जप्त करण्यात आला होता.