धक्कादायक ! ऑक्सिजन संपल्याने 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू, पुणे जिल्हयातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्ससारख्या सुविधा मिळत नाही. त्यातच आता चाकणमधील एका खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्याने तीन कोरोनाबाधित रुग्णांचा तडफडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही परिस्थिती पाहता रुग्णालयातील 20 अत्यवस्थ रुग्णांना मंगळवारी पहाटे तातडीने इतरत्र हलविण्यात आले.

ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर बेड्सअभावी अनेक कोरोनाबाधित रुग्ण दगावले आहेत. त्यातच आता चाकणमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालय प्रशासनाने ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर असलेल्या 20 रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांना अन्यत्र हलविण्याच्या सूचना पहाटे साडेतीन-चारच्या सुमारास केल्या. त्यानंतर रुग्णवाहिकाही आल्या. यातील काही रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्यात आले. तर काही रुग्णांसाठी व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध झाले नाहीत. यात तीन जण दगावले. यामध्ये नेमका किती जणांचा मृत्यू झाला, काय परिस्थिती होती, याची पडताळणी सुरू आहे, अशी माहिती चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदा ढवळे यांनी दिली.

दरम्यान, ऐनवेळी ऑक्सिजन पुरवठा संपल्याने 25 वर्षीय तरुण, 45 वर्षीय व्यक्ती आणि 65 वर्षीय महिलेचा यामध्ये मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याचे डॉ. नंदा ढवळे यांनी सांगितले.

नातेवाईकांची ऑक्सिजनसाठी धडपड

रुग्णालयात ऑक्‍सिजन संपल्यानंतर काही रुग्णांच्या नातेवाईकांनी सोमवारी म्हाळुंगे येथून ऑक्सिजन सिलेंडरसाठी प्रयत्न केले. त्यानंतर काही ऑक्सिजन सिलेंडर मिळाले. मात्र, मंगळवारी (ता. 20) पहाटे ते संपले. यानंतर रुग्णालय प्रशासनाने रुग्णांना देण्यासाठी ऑक्सिजन नसल्याचे सांगत सर्व अत्यवस्थ रुग्णांना तातडीने अन्य ठिकाणी हलवण्यास सांगितले. अखेरीस यातील तीन रुग्णांनी इतरत्र जाण्याच्या प्रयत्नात ऑक्सिजनअभावी प्राण सोडले.