अमरावती : भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आधी पती, त्यानंतर मुलगी आणि काही तासातच पत्नीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमरावती – नागपूर महामार्गावर रिंगरोड चौकात गुरुवारी (दि. 18) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे विर्शी गावावर शोककळा पसरली आहे.

गौतम शंकर मेश्राम (वय 45), पत्नी कविता गौतम मेश्राम (वय 40) आणि मुलगी जिया गौतम मेश्राम (वय 9, सर्व रा. विर्शी) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. या प्रकरणी नांदगावपेठ पोलिसांनी ट्रेलरचालक प्रशांत रामजुध्या शर्मा (रा. अजगरी, बिहार) यास अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत गौतम मेश्राम हे मजुरी करत होते. नुकतीच त्यांची कामगार म्हणून अमरावती येथील कार्यालयात नोंद झाली होती. त्यामुळे ते किट घेण्यासाठी गुरुवारी (दि. 18) दुचाकीवरून पत्नी व लहान मुलीसह अमरावतीला आले होते. त्यानंतर कपडे खरेदीसाठी सायंकाळी दुचाकीवरून (एमएच 27 बीयू 9945) नांदगावपेठ येथे गेले होते. तेथून परत विर्शीकडे येताना महामार्गावरील रिंगरोडवर ट्रेलरने दुचाकीला धडक दिली. अपघातात पती-पत्नीसह चिमुकली जखमी झाली. जखमींपैकी गौतम मेश्राम यांचा गुरुवारी (दि. 18) जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर मुलगी जिया व पत्नी कविता यांना शहरातील दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान आधी मुलगी जिया हिचा तर, त्यानंतर आई कविता मेश्राम यांचाही मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.19) शवविच्छेदनानंतर गावात तिघांवरही एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.