वर्धा : ट्रकला भरधाव कारची धडक, तिघांचा जागीच मृत्यू, एकजण जखमी

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला आहे. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. पुलगाव ते वर्धा मार्गावरील मलकापूर-केळापूर शिवारात सोमवारी (दि.25) रात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला.

दिलीप इंगोले (वय 65 वर्ष ), दीपक चैतराम मुंजेवार (वय 43 वर्ष) आणि सुरेखा दिलीप इंगोले (वय 58 वर्ष) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर कार चालक महिला हेमंती दीपक मुंजेवार किरकोळ जखमी झाली आहे. तर तिचे दोन मुल सुरक्षित आहेत. सर्व मृतक आणि जखमी नागपूरच्या हिंगणा परिसरातील रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डिझेल संपल्याने चालकाने ट्रकला रस्त्याच्या कडेला उभी केली होती. याच ट्रकला भरधाव वेगाने मागून एका कारने जोरदार धडक दिली. ही कार महिला चालवत होती. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. कारमध्ये एकूण सहाजण होते. या दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पुलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तर मृतकांचे पुलगाव येथील रुग्णालयात शविच्छेदन करण्यात आले. पुलगाव पोलीस तपास करत आहेत.