Satara News : रात्रीच्या अंधारात पुलावरुन दुचाकीसह तिघे नदीत कोसळले; दोघांचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर 

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –   रात्रीच्या अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून भरधाव निघालेले तिघे तरुण बांधकाम सुरू असलेल्या पुलावरून दुचाकीसह थेट नदीत कोसळले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. कराड-चांदोली-रत्नागिरी मार्गावर उंडाळेनजीक मांड नदीवर रविवारी (दि. 18) मध्यरात्री ही दुर्घटना घडली.

जाणू भैरू झोरे आणि कोंडीबा भागोजी पाटणे अशी मृतांची नावे आहेत. दगडू धिरु झोरे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील भेंडवडे (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील आहेत. जखमीवर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही मित्र दुचाकीवरून (एमएच-09 एफपी4022) मध्यरात्री उंडाळेकडून कराडकडे निघाले होते. उंडाळे येथे दक्षिण मांड नदीवर पुलाचे काम सुरू आहे. ठेकेदाराने येथे दूरवरून पर्यायी रस्ता दिला आहे. मात्र रात्री रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे दुचाकीवरुन भरधाव वेगात निघालेले तिघेही बांधकाम सुरू असलेल्या पुलावरून दुचाकीसह थेट नदीत कोसळले. रात्री दीड वाजता पुलाजवळ काम करत असलेल्या कामगारांनी अपघातग्रस्तांना मदत करुन बाहेर काढले. दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र डांगे व त्यांचे सहकारी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले. कराड तालुका पोलीस तपास करत आहेत.