Coronavirus : ‘कोरोना’मुळं 24 तासात राज्य पोलिस दलातील तिघांचा मृत्यू

मुंबई/पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – राज्यात आज आणखी तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. एकाच दिवशी तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यामध्ये मुंबईमधील दोन तर पुण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

मुंबईत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक हरिभाऊ पिंगळे यांचा कोरोना संसर्गामुळे आज मृत्यू झाला. तसेच मुंबईतील पार्कसाईट पोलिस ठाण्यात तैनात असलेले हेड कॉन्स्टेबल गणेश चौधरी (वय ५७) यांचा संसर्गामुळे मृत्यू झालेला आहे. दोन्ही अधिकाऱ्यांचा समावेश ‘हाय-रिस्क एज ग्रुप’ मध्ये होता. त्यामुळं एप्रिलपासून ते रजेवरती होते.

तर पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या दीपक सावंत (वय ४२) यांचा आज मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला. दीपक सावंत हे वाहतूक शाखेत कार्यरत होते. कर्तव्यावर असताना काही दिवसांपूर्वी दीपक यांना संसर्गाची लागण झाली होती.

आतापर्यंत १५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू…

राज्यात आतापर्यंत १५ पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला आहे. त्यामध्ये मुंबईमधील आतापर्यंत ११ पोलिस कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. पुण्यातील दोन तर नाशिक आणि सोलापूरमधील प्रत्येकी एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मिळालेल्या माहितीनुसार, १३२८ हुन अधिक पोलिसांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. त्यात १३६ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर ३२४ हुन अधिक पोलिस बरे होऊन घरी परतले आहेत.