‘त्या’ मारहाण प्रकरणी ३ पोलीस तडकाफडकी निलंबित

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – एखाद्या ठिकाणी गुन्हा झाला तर पोलीस अगोदर गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतात. पण, बीडमध्ये त्याच्या उलट घडताना दिसून आले. एका नेत्याला मारहाण करणाऱ्यांना पकडण्याऐवजी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांना त्यांनी मारहाण करणाऱ्यांना अडविले नाही म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. हवालदार एस.पी. शेळके, पी.के. सानप व महिला पोलिस डी.व्ही. चाटे यांच्या निलंबनाचे आदेश अधीक्षक जी. श्रीधर यांनी काढले आहेत.

खासदार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारे काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांना मुंडे समर्थकांनी केलेली मारहाण पोलिसांना भोवली आहे. मारहाण होत असताना तेथे उपस्थित असूनही त्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने त्या तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे मारहाण प्रकरणी तीन पोलिसांचं निलंबन

बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जात दिलेल्या माहितीला काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांनी आक्षेप नोंदवला होता. तशी त्यांनी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली होती. या तक्रारीची माहिती पंकजा मुंडे समर्थकांना मिळाल्यानंतर ते तातडीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातून दादासाहेब मुंडे हे बाहेर पडताच त्यांना समर्थकांनी मारहाण केली होती. यावेळी तेथे तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्ताला होते. पण, ही मारहाण होत असताना त्यांनी पुढे जाऊन कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी या तिघांना निलंबित केले.

या घटनेचा काँग्रेसने निषेध केला असून मुख्य निवडणुक आयुक्तांकडे तक्रार करणार आहेत. येत्या २४ तासात आरोपींना अटक केले नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे नेते रवींद्र दळवी यांनी दिला आहे. दरम्यान, मुंडे यांना मारहाण करणाऱ्यांपैकी काही जणांना पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली व त्यांची थोड्या वेळाने जामीनावर सुटका केली.

काय होता आक्षेप ?

प्रीतम मुंडे यांची मतदार संघात दोन ठिकाणी नावे आहेत. प्रीतम मुंडे यांनी उमेदवारी अर्जात त्याची माहिती दिलेली नसल्याचा दादासाहेब मुंडे यांनी दावा केला होता. तसेच प्रीतम मुंडे यांच्यावर पोलीस ठाण्यात एका गुन्ह्याची नोंद आहे. या गुन्ह्याबाबतची माहिती त्यांनी उमेदवारी अर्जात दिलेली नाही. तसेच प्रीतम यांनी त्यांच्या मालमत्तेवरील नावात स्वत:च्या नावासमोर पतीचे नाव लावले आहे. मात्र, केवळ मते मिळविण्यासाठी उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी स्वत:च्या नावासमोर वडिलांचे नाव लावले आहे, अशा तक्रारी दादासाहेब मुंडे यांनी केल्या होत्या. मात्र, निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी हे आक्षेप फेटाळून लावले आहेत.