पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकार्‍यासह 3 कर्मचारी बडतर्फ

पोलिसनामा ऑनलाईन – पालघरमधील डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे झालेल्या साधुंच्या हत्याकांडप्रकरणी कासा पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी आनंदराव काळे यांच्यासह तिघांना बडतर्फ करण्यात आले आहे. त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक रवी साळुंखे, कॉन्स्टेबल नरेश धोडी यांचा समावेश आहे.

मुंबईहून सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी प्रथम कासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आनंदराव काळे, उपनिरीक्षक सुधीर कटारे, सहाय्यक फौजदार आर. बी. साळुंखे व दोन कॉन्स्टेबल यांना यापूर्वी निलंबित करण्यात आले आहे. तर पालघरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. हे प्रकरण घडल्यानंतर कासा पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्‍या 35 पोलीस कर्मचार्‍यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली होती. गुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकरणी दाखल केलेल्या तीन तक्रारींमध्ये स्वतंत्रपणे दोषारोपपत्र दाखल केले आहे व याची सुनावणी ठाणे येथील विशेष न्यायालयात होत आहे. याप्रकरणी विभागीय चौकशी करण्यात येत असून कासा पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक आनंदराव काळे यांच्यासह उपनिरीक्षक रवी साळुंखे, कॉन्स्टेबल नरेश धोडी यांना बडतर्फ करण्यात आले आहे.