घरी जाण्यास सांगितल्याचा राग आल्यामुळे जमावाचा पोलिसांवर हल्ला, 3 पोलीस जखमी

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या पार्श्वभूमिवर नागरिकांना घराबाहेर पडण्यास निर्बंध आहेत. असे असतानाही घरात जाण्याचे आवाहन करणार्‍या पोलिसांच्या गस्ती पथकावर 15 ते 18 जणांनी हल्ला केला. त्यामध्ये शिरपूर तालुका ठाण्याचे तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिरपूर तालुक्यातील लाकडया हनुमान गावात मंगळवारी रात्री हा प्रकार घडला.

हवालदार लक्ष्मण गवळी, पोलीस नाईक बाळू चव्हाण, चालक राजु गिते हे जखमी झाले. याप्रकरणी रामदास पाडवी, सहदेव पाडवी, दीपक पाडवी, दुकानदार विश्वास पाडवी यांच्यासह 10 ते 15 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात हवालदार योगेश मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास लाकडया हनुमान गावात लोकांनी घराबाहेर पडू नये, घरात निघून जावे असे आवाहन गस्ती पथकाव्दारे करण्यात येत होते.

रस्त्याने फिरणार्‍या काही जणांना पोलिसांनी हटकले. संचारबंदी असल्याने घरी निघून जाण्यास त्यांनी लोकांना सांगितले. त्याचा राग येऊन संबंधितांनी इतर लोकांना बोलावून गोंधळ घातला. आरडाओरड करीत त्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. दगडफेकीत पोलिसांच्या वाहनाचे नुकसान झाले.