बीड : व्यापाऱ्याला लुटणारे तिघे गुन्हे शाखेकडून जेरबंद

केज (बीड) : पोलीसनामा ऑनलाइन – दुचाकीवरून जाणाऱ्या व्यापाऱ्याला अडवून चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या त्रिकुटाला केज गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापाळा रचून अटक केली. चोरट्यांनी व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत ४ लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला होता. हा प्रकार १६ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास साळेगाव जवळील विद्युत उपकेंद्रासमोर घडला होता.

अशोक मधुकर काळे (३४, रा. कल्पना नगर , कळंब जि. उस्मानाबाद), राहुल रामचंद्र काळे (२३, रा. रामेश्वरवाडी ता. केज), गौतम दशरथ शिंदे (१९, नेकनूर तारा जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रमेश कोमटवार यांनी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. चोरट्यांनी कोमटवार यांना चाकूचा धाक दाखून सोन्याच्या अंगठ्या, लॉकेट, रोकड आणि मोबाईल असा ऐवज चोरून नेला होता.

रमेश कोमटवार हे शुक्रवारी (दि. १६) रात्री आठच्या सुमारास कळंबकडे आपल्या दुचाकीवरून जात होते. साळेगाव जवळील विद्युत उपकेंद्रासमोर पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांनी हॉर्न वाजवून त्यांना थांबवले. रमेश कोमटवार यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील ४ लाखाचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला. केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहायक निरीक्षक गजानन जाधव हे सहकाऱ्यांसह केजमध्ये गस्त घालत असताना नाव्होली शिवारात त्यांना तीन तरुण एका शेतात बसलेले आढळले. यावेळी त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी गाडी थांबवली. यावेळी पोलिसांना पाहताच त्या तिघांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. चौकशी केली तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र अधिक चौकशीनंतर त्यांनी रमेश कोमटवार यांना लुटल्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उप अधीक्षक अशोक आम्ले यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहाय्यक निरीक्षक गजानन जाधव, आवारे, नागरगोजे, राहुल शिंदे, अशोक दुबाले, सय्यद शहेंशाह, दुधाळ, साबळे यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –