दुर्दैवी ! ओढ्यात पोहायला गेलेल्या 3 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, नांदेड जिल्ह्यातील घटना

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – किनवट तालुक्यातील चिखली गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. शाळा बंद असल्यामुळे ओढ्यात पोहायला गेलेल्या ३ शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रितेश देशट्टीवाद (वय ११), गंगाधर भांडारवाद (वय १४) श्रीकांत नागुवाद (वय १४) अशी मृत मुलांची नावं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कोरोना संसर्गामुळे शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी घरीच आहेत. म्हणून वेळ घालवण्यासाठी मुले पोहण्याचा छंद जोपासताना दिसत आहे. चिखली परिसरात पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. त्यामुळे येथील ओढ्याला पाणी आल्याने गावातील रितेश, गंगाधर आणि श्रीकांत हे मित्र पोहण्यासाठी ओढ्यावर गेले. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि तिघांना सुद्धा पोहता येत नसल्याने पाण्यात बुडाले. दरम्यान, या घटनेमुळे चिखली गावावर शोककळा पसरली आहे.

नाशिक मध्ये ४ मित्रांपैकी तिघांना जलसमाधी
नाशिकच्या वालदेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या ४ मित्रांपैकी तिघांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. योगेश बागुल, महेश लांडगे आणि वैभव पवार असं या मृत तरुणांची नाव असून, सगळे नाशिक शहरातील नवीन नाशिक भागातील रहिवाशी आहे. सुट्टीची मज्जा तीन मित्रांच्या जीवावर बेतली आहे.

पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या मंगेश, महेश आणि वैभव यांनी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघे बुडाले. त्यांना पाहून पाण्यात न उतरलेल्या गणेश ह्याने स्थानिक नागरिकांना मदतीसाठी आरडाओरडा केला. तेव्हा पोहचलेल्या नागरिकांनी तिघांना सुद्धा पाण्यातून बाहेर काढलं. परंतु, त्यापूर्वीच तिघाही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

मंगेश हा मुंबई पोलीस दलात कार्यरत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, बहीण, आई वडील आहेत. महेश लाळगे हा खासगी नोकरी करत होता. त्याच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, आई वडील असा परिवार आहे. तर वैभव पवार हा इंजिनिअर असून तो एकुलता एक मुलगा होता. त्याचा पश्चात बहीण, आई वडील असा परिवार आहे.