शिरुरमध्ये ‘साडेचार’ वर्षांत ३ तहसीलदार, जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच जिल्ह्यात ३ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून कार्यरत असलेल्या तहसीलदारांच्या बदल्या राज्य सरकारने केल्या आहेत. पुणे विभागातील ३० जणांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार बदल्या केल्या आहेत. पण केवळ सहाच महिने झाले असतानाही गुरु बिराजदार यांची कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी येथे बदली करण्यात आली आहे.

वाळू तस्करीसाठी बदनाम असलेल्या दुष्काळी शिरुर तालुक्यात कोणताही तहसीलदार आपला कार्यकाल पूर्ण करीत नसल्याचे आजवर दिसून आले आहे. शिरुर तालुक्यामध्ये गेल्या साडेचार वर्षात ३ तहसीलदार आले. पण एकालाही आपला कार्यकाल पूर्ण करता आला नाही.

राजेंद्र पोळ हे २ वर्षे, रणजित भोसले २० महिने तर गुरु बिराजदार अवघे सहाच महिने तहसीलदारपदी राहू शकले आणि याला कारण आहे ते अवैध वाळू तस्करी होय. शिरुर तालुक्यात चार मोठ्या नद्या असून दर महिन्याला कोट्यवधी रुपयांची वाळूचा अवैध पद्धतीने उपसा करुन तिची तस्करी केली जाते. वाळू तस्करांचे मोठे रॅकेट येथे आहे. ते वाळू ट्रकवर कारवाई करायला आलेल्या तहसीलदार, पोलिसांच्या अंगावर वाहने घालायला कमी करीत नाही.

बिराजदार रुजु होताच त्यांनी या अवैध वाळू चोरीविरोधात कडक धोरण अवलंबित कारवाई केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाळु तस्करी थांबली होती. वाळु तस्करांवर वरदहस्त असणाऱ्या नेत्यांची डोके दुखी मात्र वाढली होती. बदलीसाठी त्यांनी थेट मंत्रालयात वजन वापरीत सुत्र हलविले, त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या कारणाआड सहा महिने झाले असतानाही बिराजदार यांची बदली झाल्याचे बोलले जात आहे.

पुरंदर रुपाली सरनोबत, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सर्वसाधारण शाखेच्या तहसीलदारपदी रोहिणी आखाडे, आंबेगाव रमा जोशी तर दौंडच्या तहसीलदारपदी संजय पाटील यांची नियुक्ती केली आहे. मावळचे रणजित देसाई यांची मिरज तहसीलदारपदी, दौंडचे बालाजी सोमवंशी यांची बदली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती केली आहे. बदली झालेल्या तहसीलदारांचे नाव  : सुषमा पाटील (महाबळेश्वर), सुशील बेल्हेकर (एसआरए, पुणे), सोनिया घुगे (एसआरए पुणे), मधुसूदन बर्गे (मावळ), दिनेश पारगे (गडहिंग्लज), शैलजा पाटील (कडेगाव), ऋषिकेश शेळके (विटा).