टँकरमधून पेट्रोल-डिझेल चोरी करणारी टोळी गजाआड

चांदवड : पोलीसनामा ऑनलाईन – चांदवड तालुक्यातील कुंदलगाव शिवारात टँकरमधून पेट्रोल-डिझेल चोरणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शनिवारी (दि.२३) मनमाड-मालेगाव रोडवरील हॉटेल गुरुकृपा येथे केली.

ज्ञानेश्वर हिरामण गिडगे, मोसीन मुन्ना शेख, शहाबाज मुन्ना शेख बोरी यांना टँकरमधून पेट्रोल काढताना रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच साठवणूक केलेला साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी टँकर व काढलेल्या पेट्रोल-डिझेलसह १५ लाख ५१ हजार ४१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मनमाड-मालेगाव रोडवर गुरु कृपा ढाब्याच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये पेट्रोल, डिझेल काढणे व त्याची साठवणूक करण्याचे बेकायदेशीर काम सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारावर नाशिक ग्रामीणच्या विशेष पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत तिघांना रंगेहात पकडले. यावेळी टँकर (एमएच १९ झेड १९१६) यातून ज्वालाग्रही पदार्थ काढणे व त्याची अवैधरित्या साठवणूक करतांना तीन इसमांना ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अविनाश गडाख, पोलीस हवालदार कुणाल मराठे, किशोर आहेरराव, प्रमोद मंडलिक, संदीप चौरे, विश्वास चौधरी यांनी केली.