तिघा मित्रांना कोणी नाही दिला थारा, PM मोदींमुळं आयुष्य बदललं अन् आता पडतोय पैशांचा पाऊस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करताना म्हटले होते की, उपजीविका करण्यासाठी फक्त नोकरी हे एकच माध्यम नाही तर अनेक प्रकारे तुम्ही पैसे कमवू शकता. तुम्ही कोणताही छोटा व्यवसाय सुरु करून आपले उत्पन्न वाढवू शकता. त्याचबरोबर दुसऱ्या व्यक्तींना रोजगार देखील देऊ शकता. तुम्ही भजी विकून देखील दिवसाला २०० रुपये मिळवू शकता. त्याकडे देखील तुम्ही नोकरीच्या स्वरूपात पाहू शकता. मात्र त्यानंतर विरोधी पक्षांनी यावर आक्षेप घेत मोठा गदारोळ घातला होता. मात्र नोकरीसाठी भटकणाऱ्या काही तरुणांना मोदींच्या या बोलण्यात तथ्य वाटले आणि त्यांनी हा व्यवसाय सुरु केला. अशीच गोष्ट आगऱ्याच्या या तीन मित्रांच्या बाबतीत घडली आहे.

तीन बेरोजगार मित्रांनी सुरु केला व्यवसाय
आगरामधील एक भज्यांचे दुकान सध्या फार चर्चेत आहे. सकाळ पासून संध्याकाळपर्यंत इथे भजीप्रेमींची गर्दी दिसून येते. हे दुकान तीन मित्र चालवत असून अनेक दिवस नोकरीसाठी प्रयत्न केल्यानंतर शेवटी त्यांनी हे दुकान सुरु करण्याचा निर्णय घेतला.

कमी भांडवलात धंदा
हा व्यवसाय सुरु करताना यातील कुणाकडेच फार पैसे नव्हते. त्यानंतर त्यांनी विचार केला कि, व्यवसाय छोटा असो कि मोठा सुरुवातीला काहीतरी सुरु करून पाहुयात. यामुळे त्यांनी भजी विकण्याचा व्यवसाय करण्याचे ठरवले आणि तिघांनी मिळून मोदी पकोडा सेंटर सुरु केले. दुकान सुरु केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांना फायदा मिळण्यास सुरुवात झाली.

मोदींपासून घेतली प्रेरणा
तीन मित्रांपैकी एक राजकुमार याने याविषयी बोलताना सांगितले कि,मोदींच्या भाषणातून आम्हाला याविषयी आयडिया मिळाली. त्यानंतर आम्ही हा व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले. सुरुवातीला हा निर्णय घेताना मनात थोडी भीती होती मात्र पाच दिवसांतच आम्हाला फायदा मिळू लागला आहे. सध्या या दुकानात १२० रुपये प्रतिकिलोने भजी विकली जात आहेत. आणि लवकरच व्यवसाय लाखांच्या घरात प्रवेश करेल असा विश्वास त्याने व्यक्त केला.