Pune : सिंहगड रोडवरील एका रूग्णालयासह वाहनांची तिघांकडून तोडफोड, शनिवारच्या मध्यरात्रीची घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सिंहगडरोड परिसरातील एका रुग्णालयासह वाहनांची तीन जणांच्या टोळक्याने तोडफोड करत प्रचंड दहशत निर्माण केली. एका दुचाकीवर हातात कोयते व तलवारी घेऊन येत या टोळक्याने तोडफोड केली. यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. शनिवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डॉ. पृथ्वीराज चव्हाण (रा. वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगडरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव जुन्या बस स्टॉप चौकापासून पाऊंजाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर शेवंता अपार्टमेंट मध्ये डॉ. चव्हाण यांचे क्लिनिक आहे. शनिवारी रात्री नऊ वाजनेचे सुमारास दुचाकी वरून तीन जण त्यांच्या दवाखाण्यात आले. एकाने माझ्या बोटाला लागले आहे. लागलीच ड्रेसिंग करा असे, चव्हाण यांना सांगितले. डॉक्टरांनी माझ्या हातातील पेशंट पहिल्या नंतर ड्रेसिंग करतो असे सांगितले. मात्र, काही क्षणातच तिघांनी दवाखाण्याच्या काचा कोयत्याने व तलवारीने फोडुन आतील सामानाची नासधूस केली. त्यांनी तोडफोड सुरू केल्यानंतर दवाखाण्यात नंबरला बसलेले इतर पेशंट घाबरुन बाहेर पळुन गेले.

यानंतर रात्री एक वाजन्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक मुख्य चौकात महापालिका शाळेसमोरील बायपास रस्त्यावर व धाबडीमध्ये रस्त्यावर पार्क केलेल्या कार व दुचाकीची तोडफोड करत वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक आयुक्त पी. डी. राठोड, वरिष्ठ निरीक्षक नंदकिशोर शेळके, पोलिस निरीक्षक सुनिल ताकवले व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र तोपर्यंत टोळके पसार झाले होते. यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करीत आहेत.

वडगाव धायरी परिसरात काल मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास दोन ते तीन जणांनी दुचाकीवरून जाताना ११ वाहनांची तोडफोड केली आहे. त्यानुसार तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.
– नंदकिशोर शेळके, वरिष्ठ निरीक्षक, सिंहगड पोलीस ठाणे