पुण्यात गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात तिघे जखमी (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील खराडी येथे सोमवारी सकाळी गॅस गळती होऊन त्यात मोठा स्फोट होऊन आग लागली. सहा महिन्याच्या मुलीसह आईवडिल गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना खराडीमधील संभाजीनगर येथे सोमवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. शंकर भवाळे (वय २८), आशाताई शंकर भवाळे (वय २२) आणि स्वराली भवाळे (वय सहा महिने) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अग्निशामन दलाकडून दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथील संभाजीनगरमध्ये शंकर भवाळे हे आपल्या पत्नी व लहान मुलीसह घरात झोपले होते. रात्री गॅस गळती होऊन तो गॅस संपूर्ण घरात पसरला होता. सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास आशाताई उठल्या व त्यांनी लाईट लावण्यासाठी बटण दाबले. त्याबरोबर मोठा स्फोट होऊन आग लागली. हा स्फोट इतका मोठा होता की, तेथील चारही खोल्यांवरील पत्रे उडाले. पत्र्याखालील सिमेंटचे मोठे गठ्ठे स्वयंपाक घरातील ओट्यावर पडले. स्फोटानंतर लागलेल्या आगीत घरातील सर्व कपडे व इतर साहित्य जळून गेले. अग्निशामक दलाने ही आग तातडीने विझविली.

या आगीत घरातील तिघेही जखमी झाले असून सहा महिन्यांची स्वराली गंभीर जखमी झाली आहे. तिघांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.