Coronavirus : कल्याणमध्ये अवघ्या 3 वर्षाच्या मुलीला कोरोनाचा संसर्ग

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोना व्हायरसने हळूहळू विळखा घट्ट केला असून बालकांमध्ये संसर्ग वाढला आहे. कल्याणमध्ये तीन वर्षांच्या मुलीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले असून आतापर्यंतच्या रुग्णांमध्ये प्रथमच बालकाची नोंद झाली आहे.

मुंबईत काल पाच नवे रुग्ण आढळले आहेत. फ्रान्स आणि अमेरिकेहून कल्याणमध्ये परतलेल्या आणि करोनाचा संसर्ग झालेल्या 37 वर्षीय पुरुषाची 33 वर्षांची पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलीलाही याची बाधा झाली आहे. फिलिपाईन्सहून 2 मार्चला वाशीमध्ये आलेल्या दहा जणांच्या गटातील 47 आणि 42 वर्षीय पुरुषांना संसर्ग झाला आहे. यांच्यातील 59 वर्षीय पुरुषाला याची बाधा झाल्यानंतर सर्व जणांच्या तपासण्या करण्यात आल्या. लिस्बेन आणि पोर्तुगाल येथून 13 मार्च रोजी मुंबईत आलेल्या 44 वर्षीय महिलेला, तिच्या एका नातेवाइकालाही कस्तुरबामध्ये दाखल केले आहे.

सध्या कस्तुरबामध्ये 14 करोनाबाधित रुग्णांसह 65 जणांना दाखल केले असल्याची माहिती पालिकेच्या उपकार्यकारी अधिकारी डॉ.दक्षा शाह यांनी दिली. दुबई पर्यटनाला गेलेल्या 40 जणांच्या चमूतील अजून एका यवतमाळच्या 51 वर्षांच्या महिलेला करोनाचा संसर्ग झाला आहे. पुण्यात या आधी आढळलेल्या रुग्णाची ही आई असून त्यांच्यासोबत सहलीला गेली होती. या चमूतील 15 जणांना करोनाची बाधा झाली असून 22 जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत.