लैंगिक अत्याचार प्रकरणात नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या पोलीस निरीक्षकाला कारावास

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – इमारतीच्या पार्किंगमध्ये खेळत असणाऱ्या एका ८ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी नवी मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्रीपाद कांबळे (वय ६१) याला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने तीन वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना १९ एप्रिल २०१६ रोजी नेरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती.

पीडित अल्पवयीन मुलगी राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये सायकल खेळत होती. त्यावेळी आरोपी कांबळे त्या ठिकाणी आला. त्याने तिला जवळ बोलावून तिचा विनयभंग केला. मुलीने हा प्रकार तिच्या मोठ्या बहिणीमार्फत आईल सांगितला. आईने नेरुळ पोलीस ठाण्यात धाव घेत २० एप्रिल २०१६ रोजी आरोपी कांबळे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी कांबळे विरुद्ध विनयभंग आणि पॉस्को कायदा १२ नुसार गुन्हा दाखल केला.

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीमध्ये आरोपीने मुलीसोबत चार ते पाच वेळा असे कृत्य केल्याचे म्हटले आहे. हा खटला विशेष पॉस्को न्यायाधीश शिरभाते यांच्या न्यायालयात आल्यावर विशेष सरकारी वकील संजय मोरे यांनी तीन साक्षीदार आणि पिडित मुलीच्या साक्षीच्या आधारे पॉस्को कलम ७ आणि ८ लावण्याची मागणी केली. याला आरोपीच्या वकिलाने विरोध दर्शवला.

दरम्यान आरोपी कांबळे याच्यावर पॉस्को कायदा ७ आणि ८ लावण्यात आला. या प्रकरणाची अंतीम सुनावणी शनिवारी झाली. यावेळी आरोपी कांबळे याला दोषी ठरवत न्यायालयाने भादंवि कलम ३५४ प्रमाणे तीन वर्षे आणि दोन हजार रुपये तसेच पॉक्सो ८ मध्ये तीन वर्षे आणि दोन हजार रुपये दंड, तर पॉक्सो १२ मध्येही तीन वर्षे आणि दोन हजार रुपये अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच दंड न भरल्यास १५ दिवसांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक एस.ए. राजगुरु यांनी केला.

आरोग्यविषयक वृत्त