Sangli News : जत तालुक्यात गरम पाणी अंगावर पडल्यानं 3 वर्षाच्या बालकाचा मृत्यू

जत/सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –  जत तालुक्यातील साळमळगेवाडी येथे गरम पाणी अंगावर पडून एका तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला, तर वडील भाजून जखमी झाले. सिद्धू (वय ३ वर्षे) असे त्या मृत मुलाचे नाव असून वडील परशुराम गुराप्पा सखरे (वय ३०)असे जखमीचे नाव आहे. उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्‍टरांनी सिद्धूला मृत घोषित केले.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की सखरे कुटुंब साळमळगेवाडी येथे एका पत्र्याच्या घरात राहात आहेत. घरी परशुराम, त्यांची पत्नी, आई – वडील व तीन वर्षांचा सिद्धू, असे आहेत. द्राक्ष बागेवर कामाला गेल्याशिवाय कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही. पहाटे ४.३० वाजता अंघोळीसाठी पाणी तापविण्यासाठी ठेवलेल्या भांड्याला धक्का लागलाआणि गरम पाणी झोपेत असणाऱ्या सिद्धूच्या अंगावर पडले. तर त्याला वाचविण्यासाठी गेलेले वडील परशुराम हे देखील जखमी झाले. यानंतर परशुराम यांनी मुलाला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्‍टरांनी सिद्धूचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मात्र, याची नोंद उशिरापर्यंत जत पोलिस ठाण्यात झाली नव्हती.