लाचप्रकरणी सहायक मोटार वाहन निरीक्षकास तीन वर्षे शिक्षा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – ट्रक वाहनावर कारवाई न करण्यासाठी मासीक हप्ता म्हणून १० हजार रुपयांच्या लाचप्रकरणी आरटीओ सुपे पोस्टचे (चंदगड) तात्कालीन सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत बाळासाहेब शिंदे (रा. कोल्हापूर) व त्यांचा खासगी एजंट समीर रवळनाथ शिनोळकर (रा. यशवंतनगर, ता. चंदगड) यांना प्रत्येकी तीन वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली.

गडहिंग्लज येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश तथा अप्पर जिल्हा न्यायाधीश अनिरुद्ध प्रतिनिधी यांनी ही शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील सुनील तेली यांनी काम पाहिले. याप्रकरणी चंदगड तालुक्यातील शिनोळी येथील आकाश घोरपडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

आकाश घोरपडे यांचा ट्रक वाहनाचा व्यवसाय आहे. या वाहनावर कारवाई न करण्यासाठी तत्कालीन सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत बाळासाहेब शिंदे (रा. कोल्हापूर) यांनी मासीक हप्ता म्हणून १० हजार रुपयांची लाच मागितली होती; त्यासाठी आरोपी समीर शिनोळकर या खासगी एजंटाला वापरले होते; त्यामुळे तक्रारदार आकाश घोरपडे यांनी दि. २२ एप्रिल २०१५ रोजी प्रशांत शिंदे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

या खटल्यामध्ये फिर्यादी घोरपडे यांनी न्यायालयासमोर सबळ पुरावे मांडले; त्यामुळे विशेष न्यायालयाने प्रशांत शिंदे व खासगी एजंट समीर शिनोळकर यांना दोषी ठरवून प्रत्येकी तीन वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास तीन महिने जादा साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सरकारतर्फे गडहिंग्लज अतिरिक्तसरकारी अभियोक्ता सुनील तोली यांनी काम पाहिले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक उदय आफळे यांनी केला.