पोलीस ठाण्यात तिघांकडून पोलीसांना बेदम मारहाण ; ४ पोलीस जखमी 

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – भावाला ताब्यात घेतल्याच्या कारणावरून शहर पोलिस स्टेशन मध्ये तिघांनी प्रचंड गोंधळ घालत पोलिस कर्मचार्‍यांना बेदम मारहाण केली. या घटनेत ४ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक गणेश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार योगेश हनुमंत भोकरे  (वय २१ रा. जोरावली सोसायटी, साक्री रोड,धुळे), विकास सुधाकर गोमसाळे (वय २८ रा. बाहुबली सोसायटी, साक्री रोड, धुळे) व प्रविण गंगाधर मंडलीक  (वय २२ रा. मित्रकुंज सोयाटी, साक्री रोड,धुळे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

२१ एप्रिल रोजी साध्वी प्रज्ञादेवी यांच्याबाबत विवेक देशमुख याने कॉमेट्स केल्याबाबत दिलेल्या चौकशी अर्जाची चौकशी करण्यासाठी तिघे आज दुपारी पोलिस निरीक्षकांच्या दालनात आले. त्यांना पोलीस निरीक्षक चौधरी यांनी अर्ज उपनिरीक्षक वाघ यांच्याकडे चौकशीसाठी दिला होता, परंतू ते बंदोबस्तास असल्याने हा अर्ज उपनिरीक्षक इंगळे यांना दिला आहे. त्यांची तुम्ही भेट घ्या व तुमचे म्हणणे त्यांना सांगा, असे सांगितले. तेव्हा विकास गोमसाळे याने माझा भाऊ नितीन उर्फ गोपाळ याच्याविरूध्द आपण कुठलीही चौकशी न करता त्याला दोन वेळा खोट्या गुन्ह्यात अटक केली, असे मोठ्याने बोलत दबाव आणून हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे पोलिस कर्मचार्‍यांनी तिघांना दालनातून बाहेर काढले. पुन्हा तिघांनी आरडा-ओरड करून पोलिस कर्मचार्‍यांना बेदम मारहाण केली. त्यात पोलीस नाईक योगेश सुभाष चव्हाण, पोलीस कॉंन्सटेबल कमलेश सुरेश सुर्यवंशी, प्रदीप सिताराम धिवरे, प्रल्हाद सुकदेव वाघ हे जखमी झाले.

त्यादरम्यान तिघांना व्हरांड्यात बसविले असता विकास गोमसाळे याने दारावर जोरात डोके आपटून स्वतःच्या नाकावर किरकोळ दुखापत करून घेत पोलिसांनी आम्हाला मारहाण केली, अशी तक्रार करू, अशी धमकी दिली. तसेच शासकीय मालमत्तेचे १ हजार रूपयांचे नुकसान केले. उपनिरीक्षक एस. जे. वळवी पुढील तपास करीत आहेत