किकी चॅलेंजवाल्या तीन तरूणांना रेल्वेचा दणका, स्थानक सफाई करण्याची दिली शिक्षा

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन-

सोशल मिडियावर अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या किकी चॅलेंजचा प्रभाव भारतात देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. अनेक तरुण-तरुणी किकी चॅलेंजचा व्हिडिअो तयार करुन सोशल मिडियावर अपलोड करत आहेत. मात्र विरारमधल्या रेल्वे स्थानकामध्ये किकी चॅलेंजचा स्टंट करणाऱ्या तिघांना रेल्वे कोर्टाने चांगलाच दणका दिला आहे. त्यांना चक्क रेल्वे कोर्टाने स्थानकाची सफाई करण्याची शिक्षा दिली आहे. एक नव्हे तर तीन दिवस त्यांना हे काम करावं लागणार आहे.
[amazon_link asins=’B006YBARCA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0e63bbc2-9bab-11e8-b042-0984654d5218′]

किकी चॅलेंज म्हणून या तरूणांनी रेल्वेस्थानकात स्टंट केले होते. सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झालेले हे चॅलेंज या तीन तरुणांना महागात पडले. सुमारे दोन लाख जणांनी त्यांचा हा व्हीडियो पाहिला होता. आरपीएफने विरारमधून निशांत (वय २०), ध्रूव शाह (वय २३) आणि श्याम शर्मा (वय २४) या तिघांना बुधवारी अटक केली. त्यानंतर रेल्वे कोर्टात त्यांना हजर केले असता अशी आगळीवेगळी शिक्षा त्यांना सुनावण्यात आली.

सदरचा व्हिडिअो ध्रुव शहा आणि त्याच्या दोन मित्रांनी तयार केला होता. या व्हिडिअोमध्ये एक तरुण लोकलमधून उतरतो आणि प्लॅटफाॅर्मवर डान्स करायला सुरूवात करतो. त्यानंतर पुन्हा तो धावत्या लोकलमध्ये चढतो. तसेच हा सर्व प्रकार त्याचे इतर दोन मित्र मोबाईलवर शूट करत असल्याचेही दिसत आहे. हा संपूर्ण प्रकार धोकादायक असून त्याच्यामध्ये एखाद्याचा जीव देखील जावू शकतो. याशिवाय अन्य तरुण याचं अनुकरण करतील आणि जास्त जास्त जणांचा जीव धोक्यात येईल अशी भिती व्यक्त केली होती. याप्रकरणाची गांभिर्याने दखल घेत कारवाई करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला होता. यानुसार रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने विरारमधून ध्रुव आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केली.