सख्खा बापच ठरला पक्का वैरी ! संपत्तीच्या वादातून मुलाचा गोळी झाडून खून

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – वडीलांनीच संपत्तीच्या वादातून आपल्या पोटच्या पोराचा जीव घेतल्याची घटना घडली. मुलावर बंदुकीतून गोळी झाडून बापाने हत्या केल्याचा प्रकार अकोल्यात घडला. ही घटना जठारपेठ चौकातील इंद्रायणी मतिमंद शाळेजवळील ब्रम्हांडणायक अपार्टमेंटमध्ये घडली. मृताचे नाव मनीष भारती आहे. बाबा भारती असे हत्या करणाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे बाबा भारती हे काँग्रेसचे नेते आहेत तर मुलगा राजेश भारतीही काँग्रेसचा मोठा नेता आहे.

बऱ्या काळापासून या बाप-लेकात संपत्तीवरुन वाद सुरु होता. परंतु या वादाने आता परिसीमा गाठली होती. मनिष भारती हा वडील बाबा भारती यांच्या घरी धारदार शस्त्र घेऊन गेला होता. तेथे त्यांच्यात संपत्तीवरुन वाद झाला. मुलाच्या हातातील शस्त्र पाहून बाबा भारती यांनी बचावासाठी स्वत: जवळील बंदूक काढली. मुलगा अंगावर येत असल्याचे दिसताच त्यांनी बंदूकीतून मुलाच्या छातीवर गोळी झाडली.

या हल्ल्यात मुलगा मनीष जागीच ठार झाला. पोलिसांना घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी सिव्हिल लाइन, रामदास पेठ यांच्यासह शहर उपअधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी दाखल झाले. पोलिसांनी बाबा भारती यांना ताब्यात घेतले आहे. घटनेबाबत बाबा भारती यांनी पत्रकारांशी संवाद साधून घटनेची तोंडी माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी मनीष भारती याला तीन महिन्यासाठी तडीपार करण्यात आले होते. मनीष भारती गुन्हेगारी स्वरुपाचा आहे. त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल आहेत. परंतु घटनेनंतर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.