आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नातून खर्डा व जवळ्यात मोफत शिवभोजन थाळी केंद्र सुरु

जामखेड : पोलीसनामा ऑनलाइन  –  खरा लोकप्रतिनिधी तोच, ज्याला आपल्या माणसांच्या पोटाची काळजी असते, ही बाब कर्जत जामखेडचे लोकप्रिय आ. रोहित पवार यांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नातून जामखेड तालुक्यातील खर्डा व जवळा येथे राज्य सरकारचा उपक्रम असणारे शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यात आले आहे. कोरोना संचारबंदीच्या या काळात जामखेड तालुक्यात सुरु झालेला मोफत शिवभोजन थाळीचा हा उपक्रम तालुक्यातील अनेक गरीब व गरजू नागरिकांसाठी वरदान ठरत आहे.

कोरोनाच्या या दुस-या लाटेत बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेऊन संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध निर्बंध तालुक्यात घालण्यात आले . तालुक्यात रोजंदारीवर काम करण्यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यातून आलेल्या मजुरांची संख्या जास्त आहे. दरम्यान सद्यपरिस्थितीत रोजंदारीची कामे बंद आहेत. तेव्हा या नागरिकांचे तसेच तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब असणा-या नागरिकांचे अन्नावाचून हाल होणार नाहीत, याची आ. रोहित पवार यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील खर्डा व जवळा याठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यात आले आहे. यापैकी एक केंद्र खर्डा-जामखेड रोडवरील खर्डा इंग्लिश स्कूलसमोर सुरु करण्यात आले आहे. तर दुसरे केंद्र जवळा येथे बस स्टँडसमोर हॉटेल समाधान येथे सुरु करण्यात आले आहे. या दोन्ही केंद्रांवर दररोज सकाळी ८ ते ४ या वेळेत मोफत जेवणाची थाळी देण्यात येत असून या थाळीत ३ चपाती, भाजी, वरण, भात या पदार्थांचा समावेश आहे. यावेळी दोन्ही केंद्रावर गर्दी होणार नाही व कोरोना काळातील सर्व नियम पाळले जातील याची संपूर्ण दक्षता शिवभोजन थाळी खर्डा केंद्राचे चालक महालिंग कोरे व जवळा केंद्राचे चालक अशोक पठाडे हे घेत आहेत. आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नातून सुरु करण्यात आलेल्या या शिवभोजन थाळी उपक्रमामुळे जामखेडमधील गरीब व गरजू नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

आ. रोहित पवार – कोरोनाच्या या सद्यपरिस्थितीत रोजंदारीवर काम करणा-या अनेकांची कामे बंद आहेत, अशा परिस्थितीत गरीब व गरजू नागरिकांचे जेवणाचे हाल होऊ नयेत, या जाणिवेतून शासनाच्या वतीने खर्डा व जवळा या ठिकाणी प्रत्येकी एक मोफत शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यात आले आहे.